दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात महार वतनाच्या जमिनी आहेत. महार वतनासह पाटील, रामोशी, कुलकर्णी, देवस्थान वतनाच्या जमिनी देखील आहेत. पंरतु, या जमिनींसंबंधी गैरव्यवहार तसेच फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे गैरव्यवहार आणि फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत संबंधित जमिनी ताब्यात घेवून या जमिनींच्या मुळमालकांना ‘भूमिहीन शेतकऱ्यांना’ ती परत मिळवून द्यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरूवारी करण्यात आली आहे.बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने आणि प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांच्या नेतृत्वात यासंबंधी बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी विविध वतनाच्या जमिनी शासन संपादित करीत असेल तर इतर खालसा जमिनीप्रमाणे शासकीय दर देण्याची मागणी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.बारामती लोकसभा मतदार संघातील विविध दुर्लक्षित प्रश्नांसंबंधी पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा अँड.संदीप ताजने यांनी दिली. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील प्रशासन वाऱ्यावर आहे. जात पडताळणी विभागात मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे. या गैरव्यवहाराचा फटका सामान्य व गरजू नागरिकांना बसत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी अनेकांना शिक्षण,नोकरी व राजकीय अस्तित्व गमवावे लागत असल्याचा दावा अँड.ताजने यांनी केला.
प्रशासकीय भोंगळ कारभारामुळे जात प्रमाणपत्रासह उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर, रहिवासी दाखला,हयात असल्याचा दाखला व अशा प्रकारच्या कागदपत्रे मिळवण्यासाठी कार्यालयांची उंबरठे नागरिकांना झिझवावी लागत आहेत, असा आरोप देखील अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केला.शिक्षणाचा अधिकारानूसार मागासवर्गीय मुलांना सर्व शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी प्रदेश प्रभारी मा.हुलगेश भाई चलवादी यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना बरेच नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, इंदापूर तालुक्यातील दलित, मागासवर्गीय वस्त्यांमधील राहत्या घरांच्या नोंदी, गायरान आणि गावठाणातील ग्रामपंचायत दप्तरी नोंदी घावी, दौंड शहरातील रेल्वे हद्दीतील राहती घरे, अधिकृत करण्यात यावी व घरकुल योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा शिवाय शहरामधील नगरपालिकेचे रस्ते, गटारांची दुरूस्ती करण्याची मागणी चलवादी यांच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश महासचिव मा.सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव मा.अजित ठोकळे,मा.भाऊ शिंदे साहेब, मा.शीतल गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मा.रमेश अप्पा गायकवाड, महासचिव मा.बापू कुदळे, जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते, कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण, जिल्हा सचिव विशाल घाडगे, संतोष सवाने, मनीष कांबळे, दीपक सावंत, आनंद फडतरे, बाबासाहेब सावंत, अनिल दनाने, मिलिंद मिसाळ, किशोर काळे, दादा पठाण, प्रदीप साबळे, राजाभाऊ झोडगे, उमाकांत कांबळे, विशाल सोनवणे, अमन खान, मोहन सोनवणे, माधुरी लोंढे, जयश्री निकाळजे, अभिजीत डेंगळे, लोंढे व जगताप ताई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.