स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे पूर्णवेळ संचालक म्हणून राकेश अस्थाना यांची नियुक्ती होताच बीएसएफच्या टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशनला सुरुवात झाली. सीमेवर टेहळणीसाठी 436 छोट्या आणि सूक्ष्म ड्रोन्स तसेच ड्रोन विरोधी सिस्टिमला मंजुरी देण्यात आली आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी शस्त्रास्त्र घेऊन येणारे कुठलेही ड्रोन पाडण्यासाठी ड्रोन विरोधी सिस्टिमची भारत-पाकिस्तान सीमेवर नुकतीच चाचणी घेण्यात आली.
व्यापक एकीकृत सीमा व्यवस्थापन योजनेंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश सीमेवरील बीएसएफच्या 1923 चौक्या सेन्सर्स, सीसीटीव्ही आणि ड्रोन फीडने सुसज्ज करण्यात येतील. यातल्या 1500 चौक्या ड्रोन्स उडवण्यासाठी आणि ड्रोन्स विरोधी सिस्टिम वापरण्यासाठी सक्षम आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यानुसार, छोट्या आणि स्क्षूम ड्रोन्सची किंमत जवळपास 88 कोटी रुपये आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाब सीमेवर बीएसएफ सध्या सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने स्वदेशी ड्रोन विरोधी सिस्टिमची चाचणी घेत आहे. मागच्या वर्षभरापासून पाकिस्तान चिनी ड्रोन्सच्या मदतीने पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमध्ये जिहादींपर्यंत रायफल, पिस्तूल, ग्रेनेड पोहोचवत आहे. शुक्रवारी असॉल्ट रायफल्स आणि अफगाण हेरॉईन घेऊन येणार्या पाच पाकिस्तानी घुसखोरांचा बीएसएफने खात्मा केला. या कारवाईतून नव्या महासंचालकांनी भारत विरोधी कारवाया अजिबात खपवून घेणार नाही असा स्पष्ट संकेत दिला आहे. तारन, तारन सेक्टरमध्ये हे यशस्वी ऑपरेशन करणार्या कंपनी कमांडरसोबत स्वत: बीएसएफ प्रमुखांनी चर्चा केल्याची माहिती आहे.