स्थैर्य, खटाव, दि. 26 : खटावचे सुपुत्र बीएसएफचे जवान अमित सुभाष पोळ (वय40) यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मीत निधन झाले. देशसेवा करणा-या एका उमद्या जवानाच्या अचानक मृत्यूमुळे खटाववर शोककळा पसरली आहे.
खटावसारख्या गावातून जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर अमित सुभाष पोळ बीएसएफ मध्ये सन 2002 साली भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमीक शिक्षण खटाव येथे झाले होते. तर महाविद्यालयीन शिक्षण सातारा व खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात झाले होते. ते सध्या नवी दिल्ली येथे बीएसएफच्या 169 बटालियन मध्ये काॅस्टेबल (ड्रायव्हर) या पदावर काम करत होते. बीएसएफ मध्ये त्यांनी एकोणीस वर्ष सेवा बजावली. या अगोदर देशातील बंगाल, आसाम, राजस्थान, जम्मू काश्मीर आदि ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले होते.
आपल्या मातृभूमीची त्यांना ओढ होती. गत सहा महिन्यांपूर्वी ते खटावला आले होते. तर आर्मी व गावातील मित्रांशी ते कायम संपर्कात असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. बांधकाम विभागातील शाखा अभियंता कै. सुभाषराव पोळ यांचा ते मुलगा होते.
जवान अमित पोळ यांच्या अकस्मीत निधनाची वार्ता खटाव मध्ये कळताच शोककळा पसरली आहे. सध्या त्यांचे पार्थिव दिल्ली येथील एम्स रूग्णालयात असून पुढील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.