
दैनिक स्थैर्य । 23 मार्च 2025। फलटण । प्रेमसंबंधाबाबत गावात बदनामी केल्याच्या संशयावरून रत्नशिव निंबाळकर (मृत) संशयिताने मित्राच्या मदतीने भावकीतील एका युवकास कारने धडक देऊन तसेच कोयत्याने वार करून निघृण खून केल्याची घटना आदर्की खुर्द (ता. फलटण येथे घडली आहे.
रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) असे खून झालेल्याचे नाव आहे. दत्तात्रय ऊर्फ काका व्यंकट निंबाळकर व त्याचा मित्र विनोद महादेव राक्षे अशी संशयितांची नावे आहेत. यातील विनोद राक्षे यास लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिसकोठडी सुनावण्यात आली आहे, तर मुख्य संशयित दत्तात्रय निंबाळकर हा फरारी आहे. दरम्यान, 12 मार्चला हा खुनाचा प्रकार घडला असून, मृत रत्नशिव याचा भाऊ कमलेश संभाजी निंबाळकर (मूळ रा. आदर्की खुर्द, हल्ली रा. प्रियदर्शन नगर लेन नंबर 1, ओल्ड सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी आज लोणंद पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्की खुर्द ,ता. फलटण येथील दत्तात्रय ऊर्फ काका व्यंकट निंबाळकर याचे एका मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत त्याच्याच भावकीतील रत्नशिव निंबाळकर याने बदनामी केली, अशा संशय दत्तात्रय निंबाळकरला होता. त्याच्याविषयी रागही त्याच्या मनात होता. या रागातून संशयित दत्तात्रय याने आपला मित्र विनोद महादेव राक्षे याच्या साथीने 12 तारखेला सकाळी सव्वादहाच्या सुमारास आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द रस्त्यावर रत्नशिव निंबाळकर याच्या दुचाकीस (एमएच 47 व्ही 0549) पाठीमागून कार (एमएच 26 बीएक्स 6546) ने जोरदार धडक दिली. यात रत्नशिव हा दुचाकीवरून खाली पडला. त्यावर रत्नशिवला विनोद राक्षे याने धरले, तर दत्तात्रेय ऊर्फ काका निंबाळकर याने रत्नशिवच्या डोक्यात, हातावर कोयत्याने सपासप वार करूनत्याचा खून केला. याबाबत रत्नशिव निंबाळकर याचा भाऊ कमलेश संभाजी निंबाळकर यांनी आज (ता. 20) लोणंद पोलिस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी विनोद महादेव राक्षे व दत्तात्रय ऊर्फ काका व्यंकट निंबाळकर (दोघेही रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून, विनोद महादेव राक्षे यास अटक केली आहे. मुख्य संशयित दत्तात्रय ऊर्फ काका निंबाळकर हा फरारी आहे. विनोद राक्षे यास आज फलटण न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवस (ता. 25) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
घटनास्थळी फलटण पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी भेट दिली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे अधिक तपास करत आहेत.