भाऊ… जिद्द का सोडली हो?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पण, आज ते पुस्तक अपूर्णच राहिले. जुन्या राजकीय पिढीचा इतिहास सांगणार्‍या या संदर्भग्रंथाची पानेच निखळली. घोडा उधळून गेला, त्याचे चित्र कुठे लावू? समोर खुंटीवर भाऊंनी ‘जिद्द’ बंगल्यात स्वतःच्या हाताने माझे औक्षण करून बांधलेला भरजरी फेटाही आज गहिवरला आहे.

भाऊ ‘जिद्द’ का सोडली हो?

– हरिष पाटणे, सातारा

रात्रीचे १२ वाजले आहेत. पण, सायंकाळपासून फलटण येथील सुभाषराव शिंदे भाऊंचा चेहरा काही डोळ्यांसमोरून जाता जाईना. या फाटक्या तोंडाच्या पण निर्मळ मनाच्या माणसाने माझ्या सारख्याच्याही काळजात घर केले होते. उभी हयात शरद पवार यांच्या भक्तीत तल्लीन झालेले भाऊ आज अचानक सोडून गेले, हे मनाला पटत नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आणि शरद पवार सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण, अशी कृती करणारे भाऊ हे पवारांच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेले अजब रसायन होते. गेल्या २०-२२ वर्षात अनेकदा त्यांना भेटलो.

मध्यंतरी फलटण येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनातील परिसंवादाला मला निमंत्रित करण्यात आले होते. संमेलनस्थळाहून निघताना सुभाषभाऊ शिंदे यांचा फोन आला. हरिषराव फलटणला आलाय समजलं, आमचा काय राजवाडा नाही, आमच्याकडे कशाला याल? तुम्ही दोन्ही निंबाळकरांच्या जवळचे, त्यातल्या त्यात रामराजे यांच्या जास्त जवळचे. जा जा नका येऊ…! निमंत्रण देण्याची भाऊंची ही अजब पद्धत.

मलाही भाऊंचा हा आक्षेप खोडून काढायचा होताच. ती संधी त्यांच्याच फोनने दिली. मी म्हणालो, मी आज तुम्हाला न सांगता तुमच्याकडे येणार होतो आणि तुम्ही जा जा काय म्हणताय? आलोच. पण, त्यांना विश्वासच बसेना. माझ्यासोबत असलेल्या सहकारी मित्रांना ते खात्री करण्यासाठी सारखे फोन करू लागले. पण, पुढच्याच काही मिनिटात जीवनधर चव्हाण आणि मी जिद्दी भाऊंच्या जिद्द बंगल्यात पोहोचलो. सोबत फलटणची पलटण होतीच. मला गेटवर पाहताच काय हरकले सुभाषभाऊ, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती, काय करू आणि काय करू नको, अशा त्यांच्या हालचाली होत्या. त्यांना विश्वास बसत नव्हता, मी त्यांच्या घरात आहे. भाऊंची ती तारांबळ मी ‘एन्जॉय’ करत होतो. मला ते टोमणे मारायचे. त्यात विखार नव्हता तर ग्रामीण भागातून जाऊन पत्रकारितेच्या वरच्या पदावर काम करत असलेल्या आपल्या भागातील मुलाबद्दलचा वेगळा स्नेहभाव त्यांच्या मनात होता. त्याचे प्रत्यंतर त्या भेटीत मला जाणवत होते. यशवंतराव चव्हाण साहेब, किसन वीर आबा, शरद पवार साहेब यांच्या जुन्या आठवणींचा खजिनाच ते रीता करत होते. माझ्यासारख्या अभ्यासकाला तसे ते सकस खाद्यच होते, जुने संदर्भ गोळा करून घेऊन जाणे, ते तपासणे आणि समकालीन राजकीय परिस्थिती का निर्माण झाली, याचा अभ्यास करणे ही माझी तशी जुनी खोड. भाऊंची भेट माझ्या त्या खोडीला आणखी एक खोडकर भेटल्यासारखीच होती. कधी दाराशेजारच्या खुर्चीवर, कधी मधेच सोफ्यावर तर कधी अचानक मधेच उभे राहून खट्याळ, परखड गावरान बाजात बोलणार्‍या सुभाषभाऊंची अस्वस्थता ही लपून रहात नव्हती.

गप्पा गोष्टी सांगता सांगता ते सारखे कुणाला तरी फोन लावत होते, आरं आण की मर्दा लवकर! म्हणत दरडावत होते. मला समजेना, भाऊ आता कुणाला आणि कशाला बोलवत आहेत? मी म्हटलं आता जाऊद्या, तुमचा आक्षेप खोटा ठरवला आहे मी, तुम्ही हरला आहात. माझे ऐकतील ते भाऊ कसले! ते म्हणाले, आता यापुढे तुम्हाला टोमणे मारणार नाही, पण फेटा बांधावा लागेल !

अच्छा! म्हणजे मघापासून जी चलबिचल सुरू होती, ती फेटेवाला लवकर येईना म्हणून होती तर! हे आता माझ्या लक्षात आले, तोवर जो फेटा शरद पवार साहेबांना भाऊंनी बांधला होता तसाच फेटा बांधायला फेटेवाला सज्ज. आता मात्र मी वरमलो होतो, भाऊंनी केलेल्या आदरातिथ्याने भारावलो होतो. ५० वर्षे शरद पवार साहेबांना सोबत करणारे सुभाषभाऊ मी त्यांना राजकीयदृष्ट्या फारशी मदत न करताही एवढा सन्मान देतात, ही भावनाच सुखावणारी होती. त्या भेटीत अगत्य होते, आपलेपणा होता, रंगपंचमीच्या रंगात मिसळून जावे अशी ती भेट न ठरवता झाली, तिच्यात कुणाविषयी द्वेषभावना नव्हती. हरिषराव शेतकर्‍यांना न्याय देताय म्हणून हा फेटा आहे आणि बघा तुम्हाला तो कसा मर्दासारखा शोभतोय, असे म्हणत भाऊ खळखळून हसू लागले.

बंगल्याला त्यांनी ‘जिद्द’ नाव का दिलं असावं, याचे कोडे त्यांच्या घरी दिलेल्या त्या भेटीत उलगडले. निरोप देताना त्यांना गलबलून आले! त्यांच्या जिद्दीनेच मला त्यांच्याकडे खेचून नेले होते.

शरद पवार यांचा सातारा दौरा असला की, नीरेच्या पुलावर भलामोठा गुलाबाचा हार सुभाष रावांचाच. स्वागत कुठेही असो, पहिला हार यांचाच, शास्त्रच होते जणू ते! शरद पवार यांनाही डाव्या उजव्या बाजूला सुभाषराव दिसले नाहीत की चैन पडायचा नाही. ‘सायेब माझा देव आहे, तो आहे तोवर भेत नसतो हा फाकड्या’ हे भाऊंचे परवलीचे वाक्य.

बाळासाहेब पाटील मंत्री झाले, तेव्हा वाईत आमदार मकरंद पाटील यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. त्या कार्यक्रमाला शरद पवार येणार होते. येताना त्यांनी सुभाषरावांना हेलिकॉप्टरमधून आणले होते. व्यासपीठावरून भाऊ मला खुणावत होते. हार पवार साहेबांच्या गळ्यात होता, पण गुलाब भाऊंच्या गोर्‍यापान गालावर फुटत होते. मी त्यांना फोन लावला, काय स्वारी आज जाम खुश दिसतेय! तसा गडी जाम लाजला. हरिषराव, सायबांनी हेलिकॉप्टरमधून आणले, १२ त माझा नंबर असणार, आता सोडत नसतो, तुमच्या राजाला ह्याह्याह्या..!

दुसर्‍या दिवशी मी ‘पुढारी’त मजेशीर बातमी छापली, पवारांनी आजवर काही नाही दिले तरी निदान हेलिकॉप्टरमधून शेजारी बसवून आणले, सुभाषरावांच्या निष्ठेचे सोने झाले. दुसर्‍या दिवशी सुभाषराव थेट मला भेटायलाच पुढारीत! जाम खुश, काय लिहिलंय मर्दा, आजवर कुणी माझ्यावर एवढे लिहिले नाही, आता कोणताच आक्षेप राहिला नाही, असे म्हणून पुढचे दोन तास सगळे जुने संदर्भ भाऊंनी सांगितले.

१९९० च्या निवडणुकीत चिमणराव कदम यांच्या विरोधात अपक्ष लढताना त्यांनी ‘घोडा’ हे चिन्ह घेतले होते. १९९५ ला रामराजे राजकारणात आले आणि आमचेच चिन्ह त्यांनी आम्हाला लावले, हे वाक्य कितीतरी वेळा मी त्यांच्या तोंडातून ऐकावे आणि हसता हसता पुरेवाट व्हावी. अलीकडे ते सतत माझ्याशी बोलायचे. कधी कधी मला जुने संदर्भ हवे असतील तर मी त्यांना फोन लावायचो, तेव्हा त्या संदर्भाच्या आधीची दहा वर्षे आणि पुन्हा नंतरची दहा वर्षे सगळे धमाल किस्से ते सांगायचे. त्यात इरसाल शिव्या, संताप, आलेले वाईट अनुभव सार्‍यांचे मिश्रण असायचे. त्यांची एकच इच्छा होती, त्यांना आमदार व्हायचे होते. या खेपेला साहेब मला आमदार करणार आहेत आणि नाही केले तर प्रीतीसंगमावर जाऊन मी चव्हाण साहेबांच्या समाधीवर टकरा घेणार, असे भाऊ मला बोलून गेले होते. रामराजेंना जेव्हा पुन्हा विधान परिषदेवर घेतले तेव्हा आला ना मला भाऊंचा फोन, ‘आयला हरिशराव फसिवलं आपल्याला परत, मी जातोय आज समाधीवर!’ त्या दिवशी तीनवेळा मी फोनवर त्यांच्याशी बोललो. राजकारणातल्या मर्यादा सांगितल्या, पण ऐकणार ते भाऊ कसले? ‘आमदार होऊनच दाखवतो! जिद्द आहे ह्या सुभाष शिंदेची, बघाच तुम्ही, पुस्तक लिहायंला घ्या, मी काय काय केले आहे ते. त्यावर घोड्याचे चित्र लावा…’, असा तोंडाचा पट्टा सुरू.

पण, आज ते पुस्तक अपूर्णच राहिले. जुन्या राजकीय पिढीचा इतिहास सांगणार्‍या या संदर्भग्रंथाची पानेच निखळली. घोडा उधळून गेला, त्याचे चित्र कुठे लावू? समोर खुंटीवर भाऊंनी ‘जिद्द’ बंगल्यात स्वतःच्या हाताने माझे औक्षण करून बांधलेला भरजरी फेटाही आज गहिवरला आहे.

भाऊ ‘जिद्द’ का सोडली हो?


Back to top button
Don`t copy text!