भाऊ, ‘सारी’ म्हणजे काय हो ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परवा एका जणाचा फोन आला म्हणाले,

” आमच्याकडे सध्या या करोनासोबतच ‘सारी’ आजाराचेही अनेक रुग्ण आढळत आहेत आणि करोना बरोबरच ‘सारी’ आजाराने ही बरेच मृत्यू होत आहेत तर ही ‘सारी’ आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आपण काय करत आहोत?”  काल-परवा एका पत्रकार मित्राने व्हाट्सअपवर मेसेज केला, “करोना आणि ‘सारी’ आजार याच्यामध्ये फरक काय? या दोन्ही मधील कोणता आजार अधिक गंभीर आहे?”

‘सारी’ हा खरं म्हणजे आजार नाही ते इंग्रजी शब्दांचे लघुरूप आहे.  ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये सिव्हीयर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस ( Severe Acute Respiratory Illness) असे म्हणतो या शब्दाची अद्याक्षरे घेऊन एस ए आर आय (SARI) सारी असे हे लघुरूप तयार झाले आहे. ज्या रुग्णाला ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास आहे आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करावे लागते, अशा प्रत्येक रुग्णाला ‘सारी’  रुग्ण असे म्हटले जाते. ‘सारी’ हा आजार नसून तो लक्षणांचा एक समूह (सिंड्रोम) आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये ‘सारी’ सारखी लक्षणे निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. अनेक विषाणूमुळे तसेच जिवाणूंमुळे ‘सारी’सारखी लक्षणे निर्माण होतात. थोडक्यात फुप्फुसाचा गंभीर संसर्ग म्हणजे ‘सारी’ किंवा अगदी साध्या भाषेत न्युमोनियासारखी लक्षणे म्हणजे ‘सारी’. इन्फ्लूएंझा,एडीनो, रायनो  अशा सतराहूनही अधिक विषाणूंच्या संसर्गात किंवा इतर काही जीवाणूंचा संसर्ग होऊन ‘सारी’ सारखी गंभीर लक्षणे निर्माण होतात, करोना हे या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या नियमित सर्वेक्षणाचा भाग म्हणून ज्या व्यक्ती ‘सारी’ सारखी लक्षणे घेऊन भरती होतात त्या सगळ्यांची प्रयोगशाळा तपासणी करोनासाठी देखील करतो. परंतु सगळेच ‘सारी’ रुग्ण हे करोना बाधित नसतात. सध्या एकूण ‘सारी’ रुग्णांपैकी ५ ते ८ टक्के रुग्ण करोना बाधित आढळताना दिसत आहेत. त्यामुळे लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे ‘सारी’ हा काही वेगळा आजार नाही तो केवळ लक्षणांचा समूह आहे आणि काही ‘सारी’रुग्ण हे करोना बाधित असू शकतात.’सारी’ लक्षणांची इतरही अनेक कारणे असतात, असू शकतात. तेव्हा ‘सारी’ हा काही नवीन आजार आहे आणि त्याची साथ करोना  सोबत सुरु आहे,अशी अधिकची भीती बाळगू नये. न्यूमोनिया सारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णासाठी ‘सारी’ ही सर्वसामान्य संज्ञा वापरली जाते एवढेच! आणि करोना शिवाय इतर कारणांनी देखील न्यूमोनिया होतो, हे आपल्याला माहीत आहेच, नाही का ?

डॉ प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!