स्थैर्य, सातारा, दि. १८ : “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या ; आणि “जो जे वांछील, तो ते लाहो” अशी प्रार्थना या जगासाठी करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या या भूमीमध्ये अनेक सुपुत्रांनी समाजाला विचारात्मक आणि कृतीतून दिशा दाखविली.अण्णाभाऊ त्यापैकी एक मानाचे सुवर्णपान आहे.तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. यातून समजते की शाळेतील शिक्षणापेक्षा समाजाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे…तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. केवळ दोन दिवस औपचारिक शाळेत शिक्षण घेतलेल्या अण्णाभाउंनी “समाजाच्या शाळेत” मात्र उच्च प्रतीचे आणि संवेदनशील शिक्षण घेतले . ऐन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तरुण अण्णाभाऊ यांनी किती अभ्यास केला असेल आणि अपरिमीत त्याग केला असेल ;याची कल्पनाच केलेली बरी…!!प्रचंड कष्ट, दारिद्र्य आणि अपरिमित संकटे यांच्यावर त्यांनी मात केली. त्रास देणाऱ्या समाजाविषयी तक्रार केली नाही .प्रचंड निरीक्षणशक्ती आणि समाजाविषयी तळमळ या गुणांच्या जोरावर त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या .”फकीरा” हे त्यातील एक रत्न होय…!पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आत्ताच्या काळात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणी यांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचणे ,त्यांचे विचार वाचणे आणि त्यानुसार वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे .कारण; त्यांनी अशी वाटचाल केली तरच ते इतर समाजाला दिशा दाखवतील आणि इतर समाज सुद्धा समाजशील आणि संवेदनशील होईल. जयंती पुण्यतिथी ही प्रतीकात्मक असते आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो.परंतु; विचारधारा स्वीकारणे आणि त्यानुसार वाटचाल करण्याचा थोडासा का होईना प्रयत्न करणे,हे जागरूक आणि जिवंत नागरिकाचे लक्षण आहे.अन्यथा; महापुरुषांना सोनेरी चौकटीत कोंडून ठेवल्यासारखे होते…असे व्हायचे नसेल; तर अण्णा भाऊंचे विचार ,तळमळ आणि वाटचाल यांचा अभ्यास करून आत्ताच्या समाजाने त्यानुसार वर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा .आपल्या शिक्षणाचा वापर सुशिक्षितांनी आपल्या गरीब, दीनदलित बांधवांच्या उद्धारासाठी करायला हवा. अण्णाभाऊ….तुमचे विचार, तुमची तळमळ आणि समाजाविषयी तुमची कळकळ; आम्ही प्रत्येक वाडीत, प्रत्येक शहरात ,प्रत्येक वस्तीवर शोधतोय.पेरण्याचा प्रयत्न करतोय.आम्हाला शक्ती द्या . शारीरिक दृष्ट्या तुम्ही आम्हाला 18 जुलै 1969 रोजी सोडून गेला असला तरी तुमच्या स्मृती हीच आमची खूप मोठी ताकद आहे.