‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । मुंबई । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि.  ६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट नक्की पहायला हवा.

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपुर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,

https://www.facebook.com/MahaDGIPR,

https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

या समाजमाध्यमांवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’  हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!