रुंद सरी, वरंबा पद्धत पेरणी ठरेल फायदेशीर; कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । सातारा । निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिंकावर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे, अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादनवाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरणार आहे. या पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास कमी पाण्यात अधित उत्पन्न घेणे शक्य होणार असल्याचे विजय माईनकर, कृषि विकास अधिकारी यांनी सांगितले आहे.

बी.बी.एफ पेरणी यंत्र कसे फायदेशीर ठरते – बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते. ही पद्धती कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी बीबीएफने करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते. बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात 20 ते 25 टक्के बचत, खते व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. उत्पन्नामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होते. वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीतसुद्धा पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते. पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक कीड रोगास बळी पडत नाही.

काय आहे बीबीएफ – बीबीएफ ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून, रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. त्यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या 3 ते 4 आळी 30 से.मी. किंवा 45 से.मी. अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 से.मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने ही पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे 20 ते 27 टक्क्यांपर्यंत जलसंधारण व 25 टक्के उत्पादन वाढ दिसून आल्याचेही कृषि विकास अधिकारी श्री. माईनकर यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!