राजगृहावर तोडफोड करणार्‍या धर्मांधांना जनतेसमोर आणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

स्थैर्य, सातारा, दि. 9 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाचे तोडफोड धर्मांधांनी केली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपींना जनतेसमोर आणावे, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी धर्माधांनी तोडफोड केली आहे. ही बाब राज्य व केंद्र सरकारला निश्‍चितच भुषणावह नाही. देशात आणि राज्यात दलितांवर अनन्वित अत्याचाराची परिसिमा गाठलेली असताना दलितांची अस्मिता असलेल्या राजगृहावर अचानक हल्ला होणे हे कोणा अज्ञाताचे काम नसून जातीयतेने पछाडलेल्या प्रवृत्तीचे आहे. प्रत्येकाचे आई-वडील मुलांसाठी घर बांधतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजगृह हे केवळ ग्रंथांसाठी, पुस्तकांसाठी उभारलेले आहे. हा हल्ला राजगृहाच्या भिंतीवर नसून तो बुद्ध, छ. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर झाला आहे. हा हल्ला तिथल्या कुंड्यांवर झाला नसून ज्ञानावर झालेला आहे. हा हल्ला तिथल्या मातीवर नसून पुस्तकांवर झालेला आहे. पोलीस प्रशासनाने याचा तत्काळ तपास करून आरोपींना जनते समोर आणावे. त्यांचा हेतू काय होता? बोलविता धनी कोण आहे? हा प्रश्‍न तमाम आंबेडकर अनुयायांना सतावत असताना अज्ञात या शब्दावर पोलीस प्रशासनाने मखलाशीपणा करू नये. स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या नितीमुल्यांचा अमुल्य ठेवा देशाला देणार्‍या महामानवा प्रती कोणती विघातक शक्ती कार्यरत आहे, याचे पोलीस प्रशासनासह सरकारने आंबेडकरी अनुयायांना उत्तर द्यावे.

देशात आणि राज्यात अराजकता माजवण्याच्या हेतूनेच असे कृत्य करणार्‍या धर्माधांचा आणि त्यांच्या बोलवित्या धन्याचा पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई, पश्‍चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, जिल्हा प्रभारी हेमंत भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे, महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई तपासे, वंचित आघाडी, आदिवासी आघाडी, भटकी विमुक्त आघाडी, मराठा आघाडी, युवा आघाडी, कामगार आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लीम आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय गाडे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!