दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२३ । नागपूर । शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि या योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्यात.
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथील तहसिल कार्यालयात आज कळमेश्वर आणि सावनेर तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्या यासाठी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांमध्ये एकूण चार मतदारसंघांमध्ये आढावा बैठकी घेतल्या जाईल. शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात अथवा नाही हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे लोकप्रतिनिधींचे कार्य असून त्यासाठी आढावा बैठकांच्या आयोजन करण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
जलसंधारणाच्या कामांमध्ये लोक सहभाग वाढला आहे. नुकतेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सन 2018-19 मध्ये जलसाठे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेत तातडीने सर्व वीज जोडण्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
वितरण विभागाने गेल्या वर्षीच्या प्रलंबित जोडणीला प्राधान्य देण्याबरोबरच यावर्षीच्या जोडण्याही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याशिवाय सौर -पंप योजनेसाठी जागरूकता निर्माण करण्याचे सांगितले.
श्री. फडणवीस यांनी प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अभियानांतर्गत स्थानिक स्वयंसेवी संस्था व लोकसहभागाची माहिती जाणून घेतली. प्रधानमंत्री आवास योजना,भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यस्थिती, स्वच्छ भारत अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषी क्रांती योजना,राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवीन विहिरींचे वाटप,विद्युत जोडणी आदींबाबत आढावा घेतला. शिवाय आरोग्य, शिक्षण, कृषी व खरीप पूर्व तयारी विषयीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनिल केदार, चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत,महिला बालकल्याण समिती अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व उपविभागीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी इंडो ईस्त्रायल प्रकल्पांतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या तेलगाव येथील उर्मिला राऊत यांना आणि कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील अजनी येथील रामदास उमाटे यांना त्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले.बैठकीचे सादरीकरण उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.