दैनिक स्थैर्य | दि. 01 जानेवारी 2025 | फलटण | ब्रिलीयंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात जाणता राजा सोहळा साजरा करून उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आय. ए. एस. अधिकारी विश्वासराव भोसले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, सौ. मधुबाला भोसले, श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे सचिव रणजितसिंह भोसले, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सत्कार करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने समाजामध्ये वावरले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. शाळेतील भौतिक सुविधा व माफक फी मध्ये आधुनिक उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास आपण कुठे मागे पडणार नाही असा विश्वास संस्थेचे सेक्रेटरी रणजीतसिंह भोसले यांनी पालकांना दिला.
प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी शाळेची प्रगती, नवीन येणारे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे असेल व लीडप्रणाली शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात होणारे बदल याविषयी पालकांना माहिती दिली. मुख्याध्यापक सौ. नाजनीन शेख यांनी शाळेतील घेतलेल्या वार्षिक उपक्रमांचा आढावा पीपीटी द्वारे पालकांना सांगितला.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणजे जाणता राजा सोहळा. प्री प्रायमरी मधील चिमुकल्यांनी महाराजांच्या जन्माचे सादरीकरण केले, तर प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी बालपणीचे शिक्षणापासून गड किल्ले जिंकण्यापर्यंतचा इतिहास सादर केला. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा सादर केला. यावेळी पालकांनी व उपस्थित सर्वांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावळे, सौ. जठार, सौ. शुभांगी मॅडम यांनी केले. सौ. उत्कर्षा गांधी यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्वांचे आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, ज्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला.