कोविड-१९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेतू अध्ययन उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । कोविड-१९ साथीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखण्यात काही मर्यादा आल्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमधील उणीव दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम परिपूर्णतेसाठी ‘Bridge Course’ ची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये “कोविड १९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेतू अध्ययन उपक्रम” राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा उपक्रम राबविण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली असून त्याबाबत उचित सूचना विद्यापीठांना देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधापरिषदेत सांगितले.

हा उपक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला सर्व विषयांसाठी राबविण्यात येईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल.

हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रत्येक विषय शिक्षकाची राहील. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी या उपक्रमासाठी स्वतंत्र समिती गठित करावी. पूर्वज्ञानावर आधारित नवीन सत्रातील विषयज्ञान, आकलन करण्यासाठी विषयज्ञान, संकल्पना स्पष्टता, आकलन, उपयोजन, पृथ:करण/ संश्लेषण आणि टीकात्मक मूल्यमापन या स्तरांवर आधारित पूर्वज्ञान तपासणारी निदानात्मक चाचणी आयोजित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून या घटकासाठी गरजेप्रमाणे अध्यापन तासिकांचे वर्ग व अध्यापन पध्दतीचे नियोजन करुन समृध्द उपायात्मक अध्ययन अध्यापन उपक्रमाची योजना तयार करण्यात येईल. प्रत्येक विषयासाठी अध्यापनाच्या आवश्यकतेनुसार किमान ०५ तासिका असतील. सेतू अध्ययन उपक्रमाचे वेळापत्रक विभाग समिती / महाविद्यालयांनी तयार करून वेळापत्रकाची अंमलबजावणी विभाग/ महाविद्यालय यांच्या स्तरावर सत्र प्रारंभी तात्काळ सुरु करण्यात येईल. ज्या ठिकाणी यापूर्वी सत्र सुरु झाले आहे त्या ठिकाणी पुढील अध्यापन सुरु करण्यापूर्वी करण्यात येईल. पूर्वज्ञान समृध्द होण्यासाठी या घटकांना अनुरुप असे संदर्भ ग्रंथ, साहित्य, वेब साहित्य इत्यादी बाबतची यादी उपलब्ध करून देण्यात येईल. उपायात्मक अध्यापन प्रक्रियेनंतर निदानात्मक कसोटीचे आयोजन करुन अपेक्षित ज्ञान आकलन झाले असल्याची खातरजमा करण्यात येईल. हा उपक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल.हा उपक्रम प्रथम सत्रासाठी १५ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्यात येईल. द्वितीय सत्र सुरु झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल. हा उपक्रम उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मधील सर्वच अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येईल.

यासाठी कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देण्यात येणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!