
दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । सातारा । दिवाणी दाव्यातीलहुकुमनामा मुद्रांकित करण्यासाठी 5 हजारांची लाच घेणारी सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पल्लवी रामदास गायकवाड (कारंडे), रा. पुसेगाव, ता. खटाव हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.
याप्रकरणी दि. 22 रोजी लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराच्या वडिलार्जित मिळकतीबाबत बहीण व भाऊ यांच्यात कौटुंबिक दिवाणी दावा सातारा दिवाणी न्यायालयात सुरु होता. सदर दाव्यामध्ये तक्रारदार व त्यांची बहीण यांच्यात तडजोड होऊन हुकुमनामा झाला. त्यानंतर तक्रारदार हे तलाठी कार्यालय सैदापूर येथे गेले असता त्यांना सदरचा हुकूमनामा हा मुद्रांकित करून आणण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी 26 जून रोजी तडजोड हुकूमनामा सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे अर्जदाखल केला होतो.
त्यानंतर पडताळणी करणार्या कारवाई दरम्यान कार्यालयातील ’चुकविलेला मुद्रांक शुल्क’ या कार्यासनाचा पदभार अस-लेल्या लाचखोर आरोपी पल्लवी गायकवाड हिने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या सापळा पथकात पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार राजपुरे, पोलीस नाईक जाधव, शिपाई गुरव, थोरात यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वसंत वाघमरे हे पर्यवेक्षण अधिकारी होते. अधीक्षक शिरीषकुमार देशपांडे व अप्पर अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.