स्थैर्य, सातारा दि. 20 : गेल्या काही महिन्यात वाई, भुईंंज, सातारा येथील वनखात्याचे कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात रंगेहाथ सापडले होते. तरी देखील वनखात्याची मस्ती काही कमी झालेली नाही. एकीकडे शिकारी पकडल्याची कामगिरी झळकत असतानाच साताऱ्यातील कार्यालयातच एकाकडून 57 हजार 400 रुपयांची लाच स्वीकारताना रहितपूरचे वनक्षेत्रपाल संदीप प्रकाश जोशी रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात आले तर त्याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणाऱया वनरक्षक नम्रता भुजबळ हिच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एक चांगले काम समोर येत असताना लाचखोरीमुळे खात्याची अब्रु गेलीय.
गुरुवारी वनविभागाने 12 शिकाऱ्यांची टोळी जेरबंद करुन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे वृत्त आले. तेवढय़ातच सायंकाळी 6 वाजता वनविभागाच्या सातारा येथील गोळीबार मैदान परिसरातील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. यामध्ये तब्बल 57 हजार 400 रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना संदीप जोशीसह त्याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणारी वनरक्षिका नम्रता भुजबळ सापळय़ात अडकले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
यामध्ये वनपाल संदीप जोशी याने तक्रारदारास दुर्गळवाडी, ता. कोरेगाव येथील तोडलेल्या 717 सागाच्या झाडांच्या वाहतुकीची परवाना देण्यासाठी ही लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत दि. 18 रोजी तक्रार केल्यानंतर सापळा लागला होता. यामध्ये वनखात्याचे हे दोन्ही कर्मचारी अलगदपणे सापडले आहेत. या कारवाईने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे अधिक्षक राजेश बनसोडे व सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक विनोद राजे, प्रशांत ताटे, कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी सहभाग घेतला होता.
मुख्यालयात लाच स्वीकारण्याचे धाडस..वनपाल संदीप जोशी, वनरक्षिका नम्रता भुजबळ सातारा येथील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयात बैठकीसाठी आले होते. मुख्यालयात येवून बैठकीनंतर त्यांनी तक्रारदारास लाचेचे पैसे घेवून तिथेच येण्यास सांगितले. उपवनसंरक्षक अधिकारी हाडा यांच्या दरबाराच्या परिसरातच हजारो रुपयांची लाच स्वीकारण्याचे धाडस दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशाचीही भीती वाटली एवढे निर्ढावलेपण येण्यापाठी वरिष्ठांची तर याला पाठिंबा होता काय ? याची चौकशी करावी, अशी मागणी होत असून वृक्षारोपणापासून ते अनेक बाबतीत वनविभागाचे अनेक कारनामे असून ज्यांना त्यांचा त्रास झालाय त्यांना या कारवाईमुळे आनंद झाला आहे.