स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । मुंबई । “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर फी) माफ करणार असल्याचेही, श्री. महाजन यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनी कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर, सहसंचालक अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. श्री. महाजन यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देशात कर्क रोगामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्वी 60 ते 65 वर्षे वयातील महिलांना स्तन कर्करोग होत असे. मात्र, सध्या फास्टफूडच्या जमान्यात 25 ते 35 वर्षे वयोगटातील महिला बळी पडत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा आजारही गंभीर असून यासाठी शहरांसोबत ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचा जीव वाचावा, त्यांचे वेळेत निदान होऊन त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. रुग्णालयात जाण्यास महिला घाबरत असल्याने घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्तनाचा कर्करोग हा चार स्तरांपर्यंत पसरत जातो. पहिल्या दोन स्तरांवर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णावर उपचार करणे सोपे जाते. रुग्ण वाचू शकतो. तिसऱ्या, चौथ्या स्तरावर स्तन कर्करोगाचे निदान झाल्यास सर्जरी, केमो थेरपी, रेडिएशन यानंतरही रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. आपण स्वत:ही तपासणी करू शकतो. यामुळे महिला, मुली यांनी न घाबरता स्तनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री.  महाजन यांनी सांगितले.

प्रारंभी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते कामा व आलब्लेस रूग्णालयात अत्याधुनिक आयव्हीएफ आणि युरो गायनॉकॉलॉजी सेंटरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर बालरोग विभागाचे उद्घाटन आणि पाहणी करण्यात आली. स्तन कर्करोगाचे निदान त्वरित होण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या निदान केंद्राचे उद्घाटनही मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाबाबत संपूर्ण माहिती असलेल्या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री श्री. महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!