
स्थैर्य, खंडाळा, दि.21: खंडाळा तालुक्यातील पळशी येथे गावजेवण देत चक्क प्रशासनाला चूना लावण्याचे काम सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी करीत कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खंडाळा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच प्रशासनाकडून पार करण्यात आली. यामध्ये शिरवळ जवळील संवेदनशील म्हणून ओळख असलेली व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील यांचे वर्चस्व मानणारी ग्रामपंचायत म्हणून संपूर्ण खंडाळा तालुक्यात पळशी ग्रामपंचायतीची ओळख आहे. दरम्यान,सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पराभव झाल्यानंतर नितीन भरगुडे-पाटील यांच्यासाठी पळशी ग्रामपंचायतीची निवंडूक प्रतिष्ठेची बनली होती. यावेळी पळशी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सन २०२१-२०२५ च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नितीन भरगुडे-पाटील यांना मोठ्या प्रयत्नानंतर विरोधकांना बरोबर घेऊन पळशी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले तरी पुलाखालून बरेच पाणी गेल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था सध्या झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वाची ओळख दाखविण्याकरिता नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे नागरी सत्काराचे विनापरवानगी आयोजन करीत व चक्क सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचा भंग करीत पळशीमध्ये खमंग मांसाहारी जेवण व शाकाहारी जेवणाचा बेत करीत गावजेवणाचा घाट पूर्ण करीत प्रशासनालाही ठेंगा दाखविल्याने खंडाळा तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तत्परता दाखवत गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाला एवढे मोठे कार्यक्रमाचे आयोजन कसे दिसले नाही याचे आश्चर्य खंडाळा तालुक्यामध्ये व्यक्त्त होत असून गांधारीचे भूमिका घेणारे प्रशासन गावजेवण व नागरी सत्काराच्या आयोजनावर काय भूमिका घेते याची उत्सुकता सध्या खंडाळा तालुक्यामध्ये लागून राहिले आहे.