
दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध आमदार जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष शिघेला पोचत असताना खुद्द फलटणमध्येच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आ.श्रीमंत रामराजेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखरवाडी गावामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले.
म्हसवडच्या एमआयडीसीवरुन गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे व आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून एकमेकांविरुद्ध टिका होताना दिसत आहेत. त्यातच भर म्हणून गेल्या दोन दिवसांपूर्वी श्रीमंत रामराजे राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी माण तालुक्यात गेले होते. त्यावेळी आमदार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजेंचा पुतळा जाळून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यानंतर या कृतीला प्रतिउत्तर म्हणून फलटणला राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरेंच्या पुतळ्याचे दहन केले होते. शिवाय आ.श्रीमंत रामराजे यांनी फलटण येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टिका केली होती. आता फलटणमध्येच खुद्द श्रीमंत रामराजेंचा पुतळा जाळल्या नंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साखरवाडीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुतळा साखरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाळण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.