दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील शुक्रवार पेठेत एका महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून घर खाली करण्याची धमकी देत तिला मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. असिया मोईन शेख (वय ६९, रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून रात्री उशिरापर्यंत तिला अटक झालेली नव्हती.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, मनिषा अरुण धनवडे (वय ३१, रा. ९८, शुक्रवार पेठ, सरपंच मारुती मंदिराच्या समोर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मनिषा या दि. १६ रोजी राहत्या घरी जेवण बनवत असताना तिथे असिया मोईन शेख यांनी अनाधिकाराने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देवून मनिषा यांच्या गालाखाली चापट मारली. याप्रकरणी मनिषा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर असिया शेख हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. असिया हिला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास महिला पोलीस हवालदार तावरे करत आहेत.