गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणारांवर गुन्हे दाखल करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । मुंबई । अवैध धंदे, व्यवसाय बंद करून गुन्हेगारी समूळ मोडून काढावी. समाजातील शांतता व सौहार्द भंग करणा-या व्यक्तींवर  गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

अचलपुर, चांदूर बाजार तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. कडू यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव व विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, अवैध दारुविक्री, अतिक्रमणे आदी गुन्हेगारी समूळ मोडून काढण्यासाठी पोलीसांनी काटेकोर कारवाई करावी व गुन्हेगारांवर, तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण करावा. समाजातील सौहार्द व शांतता बिघडवण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल, तर तो वेळीच मोडून काढावा. दंगलीबाबत कुठल्याही अधिकृत सुरक्षितता यंत्रणेशिवाय कुणी खासगी एजन्सी येऊन परस्पर अहवाल तयार करत असेल तर ते बेकायदेशीर व तेढ वाढविणारे ठरेल. अशा व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

व्यसनमुक्ती अभियान राबवा

व्यसनाधीनतेमुळे असंख्य गुन्हे घडतात. त्यामुळे अवैध दारूविक्रीसारखे प्रकार घडविणा-या समाजकंटकांवर गावबंदीसारखी कारवाई करावी. कुरळपुर्णा येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे नियोजन करावे. ठिकठिकाणी विविध कारणांमुळे शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यसनमुक्ति अभियान व्यापकरीत्या हाती घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सुंदर पोलीस ठाणे संकल्पना राबवा

समारंभ, मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नियमावली काटेकोरपणे अंमलात आणावी. सुंदर पोलिस ठाणे ही संकल्पना राबवावी. कर्मचा-यांना वेळोवेळी प्रोत्साहित करावे. समाजातील शांतता कायम राखण्याच्या दृष्टीने विधायक उपक्रम सातत्याने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

परतवाडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरी, चांदुर बाजारचे पोलीस निरीक्षक किंगणे, शिरजगावचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गीते, श्रीमती शीतल राऊत आदी यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!