‘कोयता गँग’ची दहशत मोडून काढा

भाजपची पोलिसांकडे मागणी


स्थैर्य, 27 फेब्रुवारी, सातारा : सातारा शहरात काही तरुणांकडून कोयते व इतर शस्त्रांचा वापर करून दहशत माजविण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी सातारा शहर (मध्य)चे अध्यक्ष श्री. अविनाश (राजेंद्र) विजय खर्शीकर यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध परिसरात तथाकथित ‘कोयता गँग’कडून व्यापारी, कामगार, व्यावसायिक तसेच शाळा-कॉलेजमधील युवक-युवतींना धमकावण्याचे प्रकार वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दुकानदार व फेरीवाल्यांना कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचाही आरोप आहे. तसेच सोशल मीडियावर हत्यारांसह व्हिडिओ प्रसारित करून आणि रस्त्यावर आरडाओरडा करत दहशत निर्माण केली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे.

या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला व विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना असुरक्षित वाटत असल्याचे खर्शीकर यांनी नमूद केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!