दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । जरंडेश्वर स्वत:च्या खासगी मालकीचा करायचा हे आधी ठरले आणि मग अडचणी निर्माण करुन, आवई उठवून तो हडपला. रयत शिक्षण संस्थेच्या घटनेत लिहिले आहे की, मुख्यमंत्री या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल पण ती घटना डावलून जवळपास ही संस्था खासगी केल्यासारखी केली. गेल्या काही वर्षात साडेनऊ हजार क्लार्क, शिपायांची भरती झाली. त्यामध्ये वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावली, महाबळेश्वरमधील किती होते? सर्वत्र खासगीकरणाचा बारामतीचा फेरा पडत असून तो किसन वीर कारखान्यावर पडू नये यासाठी जागरुक रहा. आता मी आलोय. मी स्वत: या कारखान्यात लक्ष घातले असून सभासद शेतकर्यांचीच मालकी कायम ठेवून दोन वर्षातच किसन वीर अडचणीतून बाहेर काढून दाखवेन, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी बावधन, वाई, विरमाडे आदी ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारासाठी झालेल्या या बैठकांमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, जरंडेश्वर खासगी केला. रयत शिक्षण संस्थेसाठी सातारा जिल्ह्याने योगदान दिले. कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर अनवाणी राहून, त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वत:चे मंगळसूत्र मोडून रयत उभारली. आज ती जवळपास खासगी केल्यासारखी केली आहे. स्व. मदनआप्पांनी उभारलेल्या सूतगिरणीला दिड कोट यांनी जिल्हा बँकेतून मिळू दिले नाहीत. पण बारामतीकरांच्या खासगी उद्योग समूहाला एका रात्रीत 670 कोटी रुपये दिले. या हडपणार्या, खासगीकरण करणार्या प्रवृत्तीला खरं तर इथल्या सर्वच नेत्यांनी विरोध केला पाहिजे. पण राष्ट्रवादीचे इथले नेते मूग गिळून गप्प आहेत. नेत्यावर प्रेम असावं पण शेतकर्यांना, स्थानिक जनतेला देशाधडीला लावणार्या प्रकारांना विरोध करुन जनतेशी बांधिलकी जपली पाहिजे. स्वत:च्या नेत्यापर्यंत जनतेच्या भावना पोहोचवल्या पाहिजेत.
किसन वीर कारखाना जर विरोधकांच्या ताब्यात गेला तर तो बारामतीकरांच्याच चरणी अर्पण करतील. जिल्ह्यातील सहकार संपवण्याच्या कामाला वेग येईल. मदनदादांना विरोध करत किसन वीर कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले, खेळते भांडवल मिळू दिले नाही. वर पुन्हा कारखान्याच्या विरोधात आवई उठवत आहेत. मी आता आलोय. मी स्वत: लक्ष घालून येत्या दोन ते तीन वर्षात कारखान्याची गाडी रुळावर आणून शेतकर्यांच्या मालकीच्या कारखान्याला गतवैभव मिळवून देईन. हा कारखाना शेतकर्यांच्याच मालकीचा ठेवायचा असेल तर शेतकरी विकास पॅनेलच्या पाठिशी उभे रहा. घरात अडचणी आल्या तर आपण घर नाही पेटवून देत तर अडचणी दूर करतो. ती अडचण दूर करण्याची ग्वाही मी देतो, असेही आमदार महेश शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
विराज शिंदे म्हणाले,सूतगिरणीला दीड कोटीचे कर्ज देऊ न शकणार्यानी किसनवीर ताब्यात घेण्याच्या बाता मारू नये.त्यांच्या ताब्यातील सूतगिरणी खाजगी व्यक्ती चालवीत आहे.त्यांना शेतकरीं काहीतरी घेण असत तर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतील कारखान्याला आपला कारखाना म्हणून जिल्हा बँकेतून कर्ज तर दिले नाहीच पण उलट जिथे तिथे अडचणी आणल्या. तुम्ही कितीही संकटे अडचणी उभ्या केल्या तरी हा कारखाना शेतकर्यांच्याच मालकीचा रहावा यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्या पाठिशी ठाम रहा.
प्रताप यादव,सुनील कदम यांनी किसनवीर कारखाना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी केलेल्या कारनामे सभासदांसमोर मांडले. दीपक ननावरे यांनी प्रास्ताविकात बावधन गटातून शेतकरी विकास पॅनल ला मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास दिला.
यावेळी प्रवीण जगताप,सयाजीराव पिसाळ, जयवंत पवार, सचिन भोसले यांच्या सह सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. दत्तात्रय रासकर,अशोक जाधव,विवेक भोसले,संदीप पिसाळ, यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.