स्थैर्य, मुंबई, दि.३१: बीसीसीआय यंदाच्या सत्रात प्रथम श्रेणीतील रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन करणार नाही. कोरोनामुळे सत्राला उशीर झाला आहे आणि जैवसुरक्षित वातावरणात संघटना स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने नाही. त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे मंडळाने हा निर्णय घेतला. याबाबतीत मंडळाचे सचिव जय शहांकडून सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे माहिती कळवली आहे. टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीला १० जानेवारीपासून सुरुवात झाली. आता वनडे स्पर्धा, महिला वरिष्ठ गट एकदिवसीय स्पर्धा व १९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेचे बीसीसीआय आयोजन करेल. भारत वगळता ऑस्ट्रेलिया, पाक श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, द. आफ्रिका व वेस्ट इंडीजमध्ये प्रथम श्रेणी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. कोरोनादरम्यान ८ जुलै २०२० पासून इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, श्रीलंका व बांगलादेशसह ७ देशांत सामने आयाेजित झाले.
१९३४ पासून स्पर्धेचे आयोजन, महायुद्धातही सामने झाले
रणजी ट्रॉफीची सुरुवात १९३४ मध्ये झाली. तेव्हापासून यंदा प्रथमच स्पर्धेचे आयोजन होणार नाही. म्हणजे ८७ वर्षांत प्रथमच स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान ही स्पर्धा झाली. रणजीची आतापर्यंत ८६ सत्रे झाली. मुंबई सर्वात यशस्वी संघ ठरला. टीमने सर्वाधिक ४१ वेळा किताब जिंकला.
राज्य संघटनेच्या खात्यावर जमा हाेणार नुकसान भरपाईचे पैसे
प्रथम श्रेणी स्पर्धा न झाल्याने ३८ संघांतील खेळाडूंना जवळपास १५ लाखांचे नुकसान होईल. प्रत्येक संघात २० खेळाडू असतात. म्हणजे जवळपास ७५० खेळाडूंवर त्याचा परिणाम होईल. त्यांचे ११ कोटींपेक्षा अधिक नुकसान होईल. मंडळाच्या २४ डिसेंबरला बैठकीत खेळाडूंच्या मदतीसाठी राज्य संघटनेला भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य संघटना खेळाडूंची यादी बनवते. त्याच आधारे मदत दिली जाईल.