
स्थैर्य, सातारा, दि. 9 सप्टेंबर : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या कैदेत असताना सातारा येथील कारागृहाच्या तटावरून उडी मारली होती. या उडीच्या थरारक प्रसंगाला यंदा 81 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील कारागृह परिसरात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन बुधवारी (ता. 10) साजरा करण्यात येणार आहे.
ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांती केली होती. महात्मा गांधीच्या 1942 मध्ये ’करा किंवा मरा’ या विचाराने प्रेरणा घेऊन डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी देश स्वतंत्रहोईपर्यंत स्वातंत्र्य चळवळ सुरू ठेवली. नागनाथअण्णांना ब्रिटिश पोलिसांनी ता. 28 जुलै 1944 मध्ये वाळवा येथे अटक करून सातारा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त केले होते. या अभेद्य कारागृहाच्या 18 फुटी तटावरून उडी मारत अण्णा पुन्हा भूमिगत झाले होते.
या घटनेने ब्रिटिश सत्तेला हादरा बसला होता. हा प्रसंग स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारसदार सातारा येथे दरवर्षी शौर्यदिन म्हणून साजरा करतात. यंदा बुधवारी सकाळी दहा वाजता जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्वातंत्र्य संग्रामात कारागृह भोगलेल्यांच्या स्मृतीनिमित्त उभारलेल्या स्तंभ परिसरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अण्णांच्या विचारावर प्रेम करणार्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समिती तसेच निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.