आयुष मोकाशी याचे पेढा भरवून अभिनंदन करताना त्याची आजी |
स्थैर्य, सातारा, दि. ३१ : जी मुले खेळात चमकदार कामगिरी करतात ती शिक्षणात मागे पडतात, असा समज अनेकांचा असतो. मात्र हा गैरसमज अनेक एका बॉक्सरभाईने दूर केला आहे. बॉक्सिंग क्रीडाप्रकारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या आयुष अमर मोकाशी याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले. खेळात आणि शिक्षणातही चमकणाऱ्या या बॉक्सरभाई वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
येथील गुरुकुल स्कुलचा विध्यार्थी असलेला आयुष मोकाशी हा सातारा बॉक्सिंग अकॅडमीत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. गुरुकुल शाळेकडून खेळताना त्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शाळेचे, सातारा जिल्ह्याचे, कोल्हापूर विभाग आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. शालेय आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या विविध स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने अनेक पदकांची कामे केली आहे. खेळाकडे लक्ष केंद्रीत करतानाच त्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत आला.
स्पर्धांसाठी तीन- तीन महिने शाळेपासून दूर राहणाऱ्या आयुष ने दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून सर्वांनाच अचंबित करून टाकले. या यशाबद्दल आयुष याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्रमुख राजेंद्र चोरगे आणि सर्व शिक्षक, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.