
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा शहरानजीक राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या विलासपूरच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणी देगाव, ता. सातारा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून आत्याला तिचा मुलगा वारंवार दारू पिवून त्रास देत असल्याने मृताच्या आतेभावाने व त्याच्या मित्राने हा खून केला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
जिल्ह्यात जावली तालुक्यातील मार्ली घाटातील खुनांची मालिका समोर आली असताना बुधवारी विलासपूरच्या हद्दीत वनविभागाच्या जंगलात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपासाबाबत सूचना करून गुन्हे प्रकटीकरण विभागाला सतर्क केले होते. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला काही तासातच खुनाचा छडा लावण्यात यश आले.
या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद बापू साळुंखे (वय 35) आणि साहिल मुल्ला मुलाणी (वय 19), रा. देगाव, ता. सातारा यांना अटक केली होती. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खूप वळसे घेतले. मात्र खुनाची कहाणी शेवटी वळसे गावापर्यंत पोहोचली. मृत प्रकाश सुदाम कदम हा वळसे गावचा रहिवासी. त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे तो घरात सातत्याने भांडणे करत होता. त्याच्या आईला तो सारखा त्रास देत असे.
आत्याने ही बाब तिचा देगाव येथील भाचा प्रमोद साळुंखेच्या कानावर घातली होती. त्यानंतर प्रमोदने त्याचा मित्र साहिल मुलाणीला बरोबर घेत आत्याला त्रास देणार्या आतेभावाचा काटा काढण्याचे ठरवले. दि. 26 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी त्याने दारू पिण्यासाठी प्रकाश कदमला बोलावले. विलास-पूरच्या हद्दीतील वनविभागाच्या जंगलात दारू पिल्यानंतर प्रकाश पूर्ण नशेत गेल्यानंतर सुरीने प्रकाशचा गळा कापून खून केल्याची कबुली दोन्ही संशयितांनी दिली आहे. बुधवारी रात्री त्यांना प्रकाश कदम याच्या खून प्रकरणी अटक केली असून प्रकाश कदमच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी दिली. काही तासातच या खुनाचा छडा लावल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.