दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । लोणंद । संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी येथीय वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.
बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर आज श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीचा बार साजरा केला.
या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता.