शिव्यांच्या भडीमारात रंगला ‘बोरीचा बार’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ यंदाही आज दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी येथील वाहणार्‍या ओढ्यात पार पडला. यावेळी दोन्ही गावांतील महिलांनी सनई-हलगीच्या तालावर वाजत-गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडीमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली.

नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात. बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यावेळी पुरूष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीचा बार साजरा केला.

या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे. या गावचे एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या, पैकी एक सुखेडमधील होती तर दुसरी बोरी या गावातील होती. त्या दररोज दोन्ही गावच्या शिव असणार्‍या ओढयावर धुणे धुण्यासाठी येत असत. ओढयावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकांना हातवारे करत शिव्या द्यायच्या, यावरून या बोरीचा बार अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही हा बोरीचा बार पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य लोक येत असतात.

यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता.


Back to top button
Don`t copy text!