दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । सातारा । अवैधरित्या दासरू विक्री करणाऱ्यांविरोधात बोरगाव पोलिसांनी धडक मोहीम राबविण्यास सुरवात केली।असून पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांसह सुमारे ४९,६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी दोघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागठाणे (ता.सातारा) येथील सेवारस्त्यानजीक असलेल्या अल्फा बिअर बारसमोर चोरटी दारू विक्री होत असल्याची माहिती प्रभारी सपोनि सी.एम.मछले यांना मिळाली.यावेळी सपोनि सी. एम. मछले, हवालदार एच. बी. सावंत, उत्तम गायकवाड, किरण निकम यांनी तेथे छापा टाकला. यावेळी घटनास्थळी चंद्रकांत भिकुबा माने (वय.५०,रा.नागठाणे, ता.सातारा) हा त्याचा दुचाकीवर बसून अवैधरित्या दारू विकत असताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी त्याच्याजवळून १,६१० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या १० बाटल्या व दुचाकी असा ४६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या घटनेचा पुढील तपास हवालदार एच.बी.सावंत करत आहेत.
दुसऱ्या घटनेत खोडद फाटा (ता.सातारा) येथे गणेश पान स्टोलच्या आडोश्याला चोरून दारूविक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार कपिल टीकोळे व दादा स्वामी यांनी तेथे छापा टाकला.तेथून पोलिसांनी चोरून दारू विकत असताना रामचंद्र किसन सुर्यवंशी (रा.जांभगाव, ता.सातारा) याला ताब्यात घेतले.त्याच्याजवळून पोलिसांनी २,८०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४० बाटल्या जप्त केल्या.या घटनेचा पुढील तपास हवालदार अमोल गवळी करत आहेत.