दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । सातारा । लिफ्ट मागून दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोघा संशयितांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. समीर सुनील घोरपडे (वय २२, मूळ रा.मत्यापुर, हल्ली रा. नागठाणे, ता. सातारा) व सागर रमेश शिर्के (वय ३०, रा. नागठाणे, ता. सातारा) अशी या दोन्ही संशयितांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुटाळवाडी (ता. पाटण) येथील विठ्ठल दादासो निकम हे सोमवारी सायंकाळी नागठाणे येथील प्रिन्स हॉटेलजवळ मित्राला भेटण्यासाठी आले होते. रात्री ८.३० च्या सुमारास ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले असता दोन युवकांनी त्यांना लिफ्ट मागितली. त्यानंतर गणेशवाडी गावच्या हद्दीत असलेल्या खडी क्रॅशरच्या रस्त्यावर नेऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळची दहा हजार रुपये रोख व दुचाकी असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला होता. याची फिर्याद विठ्ठल निकम यांनी मंगळवारी बोरगाव पोलिसांत दाखल केली होती.
बोरगाव पोलिसांनी तात्काळ हालचाल करत सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे समीर सुनील घोरपडे व सागर रमेश शिर्के या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरून नेलेली दुचाकी व तीन हजार रुपये रोख रक्कमही जप्त केली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. सागर वाघ, हवालदार विशाल जाधव, विजय साळुंखे, सत्यम थोरात व राहुल भोये यांनी तपासकामी सहभाग घेतला.