सीमेवर तणाव:दिल्ली-लेह ते रशियापर्यंत हालचाली वाढल्या, राजनाथसिंह यांनी घेतली चिनी संरक्षणमंत्र्यांची भेट, सुमारे 2 तास 20 मिनिटे दोघांत चर्चा


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.५: भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना पिटाळून लावल्यानंतर सीमेवरील तणाव सर्वोच्च बिंदूवर आहे. त्यावरून शुक्रवारी दिल्ली-नियंत्रण रेषेपासून (एलएसी) रशियापर्यंत हालचाली सुरू झाल्या. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लडाख भागात दाखल झालेले भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दुसऱ्या दिवशीही लेहमध्ये सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. ते म्हणाले, “एलएसीजवळील भागांत परिस्थिती तणावपूर्ण, गंभीर व नाजूक आहे, पण आमच्या सैनिकांचे मनोबल उंचावलेलेच आहे. सैन्याने सुरक्षेसाठी काही पावले उचलली आहेत, त्यामुळे परिस्थितीला तोंड देण्यास मदत होईल.”

दरम्यान, मॉस्को येथे शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) परिषदेसाठी उपस्थित संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चीनला कडक इशारा दिला. ते म्हणाले,“विभागीय स्थैर्यासाठी, शांततेसाठी चीनने आक्रमक भूमिका टाळायला हवी.’

चिनी सैनिकांना भारताने जेथून पिटाळले त्या भागात चीनने रणगाड्यांसह सैनिकांच्या तुकड्यांत वाढ केल्याचे वृत्त


राजनाथसिंह यांनी घेतली चिनी संरक्षणमंत्र्यांची भेट


मॉस्को । दोन्ही देशांतील तणाव आणि राजकीय पातळीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चिनी संरक्षणमंत्री वेई फेंग यांची भेट घेतली. सुमारे दोन तास २० मिनिटे दोघांत चर्चा झाली. लडाखमध्ये चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय पहिली राजकीय चर्चा होती.

चीनच्या हालचालींवर भारताची करडी नजर


एका टीव्ही चॅनलच्या वृत्तात म्हटले आहे की, दक्षिण पँगाँगमध्ये चीनच्या सीमेत येणाऱ्या भागात काही अंतरावर चीनची रणगाड्यांची तुकडी पोहोचली आहे. अर्थात, चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर आहे. दरम्यान, राजनाथ व फेंग यांच्यातील चर्चेत लडाखमध्ये पूर्वस्थिती राखणे व सैन्य मागे घेण्यावर भर होता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

दावा : तैवानने चीनचे सुखोई विमान पाडले

तैवानने आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी करणारे चीनचे सुखोई विमान पाडले, असा दावा माध्यमांनी केला आहे. वैमानिक मात्र सुरक्षित आहे. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!