
स्थैर्य, खटाव, दि. 01 : कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आज करोना मुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे खटावमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामार्फत करोना संकटात घरपोच पुस्तके देऊन वाचकांना घरीच राहावे व वाचन करावे, असा स्तुत्य उपक्रम वाचनालयाचे सचिव नितीन सावंत यांनी राबविला आहे.
लॉकडाऊनपूर्वी ग्रंथालय वाचकांच्या गर्दीने फुललेली दिसायची. विद्यार्थी, तरुण व ज्येष्ठ सुद्धा या वाचनायलाचे सदस्य आहेत. परंतु करोना या भयाण विषाणूमुळे अलीकडे हे चित्र पार बदलून गेले आहे. पुस्तकप्रेमींसाठी पुस्तके ही श्वास असतात. मात्र, संचारबंदीमुळे नियमित वाचकांना वाचनालयापर्यंत जाणेही शक्य नाही. त्यामुळे वाचकांची अक्षरशाहा कुचंबना होत आहे. वाचनासाठी घरोघरी येणारी नियमित वृत्तपत्रही नसल्याने वाचकांना अस्वस्थता वाटू लागली आहे. आज तंत्रज्ञान अवगत करत मोबाईल आणि इंटरनेटमुळे लोकांना पुस्तके वाचन करण्याचा विसर पडू लागला आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तके थेट वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम खटाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयांच्या सदस्यांनी हाती घेतला आहे. अशा परिस्थितीत हे वाचनालयाचे सदस्य घरोघरी पुस्तके देऊन वाचनाचा संदेश देत आहे. वाचनामध्ये कथा, कादंब-या, मासिके, पाक्षिके घरपोच देणारी ही खटाव तालुक्यातील पहिलेच वाचनालय आहे. यामुळे खटावमधील पुस्तकप्रेमीना घरबसल्या विविध पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.
या वाचनालयांमध्ये सर्व वयोगटातील पुस्तक प्रेमींसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी खटावकरांनी नितीन सावंत यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.