राज्यसभेच्या माजी सहसचिवांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । नवी दिल्ली । राज्यसभेचे माजी सहसचिव लक्ष्मण शिंदे  यांनी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ (वैदिक काळापासून वर्तमान काळापर्यंत) हे स्वलिखित पुस्तक आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट स्वरूपात दिले.

श्री. शिंदे यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ. का.) अमरज्योत कौर अरोरा यांना ग्रंथालयासाठी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ या पुस्तकाची प्रत भेट स्वरुपात दिली. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.

श्री शिंदे यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेमध्ये दुभाषक म्हणून कार्यास सुरुवात केली. ३३ वर्षांच्या सेवाकाळात विविध पदांवर कार्य करून श्री. शिंदे  सहसचिव पदाहून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले या पुस्तकासाठी त्यांना  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयातील विविध संदर्भ ग्रंथांचा उपयोग झाला. महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केले असून श्री. शिंदे यांनी पुस्तकाची प्रत ग्रंथालयाला भेट दिली. येत्या काळात या पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!