
स्थैर्य, फलटण ,दि. ०५ ऑगस्ट : शहरातील गोळीबार मैदान परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ७ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसात ते रात्री नऊच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहुल निंबाळकर (वय ४२, व्यवसाय- कन्स्ट्रक्शन) हे कामानिमित्त घराबाहेर गेले असता चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७,१६,००३/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ४ लाख रुपये रोख, एक सोन्याची चेन, मंगळसूत्र, टेम्पल हार आणि झुबे अशा विविध दागिन्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे करत आहेत.