
टाकळवाडे (ता. फलटण) येथील विकास सेवा सोसायटीच्या खत विक्री केंद्रावर बोगस खताचा साठा आढळला. याप्रकरणी कृषी विभागाने शिवसेना तालुकाप्रमुखांचे बंधू सतीश इवरे आणि सांगलीतील पुरवठादार विनायक पवार यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 09 जानेवारी : फलटण तालुक्यातील टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या खत विक्री केंद्रावर नामांकित कंपनीच्या पिशव्यांमधून बोगस आणि अप्रमाणित रासायनिक खताची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार खत विक्री केंद्राचे जबाबदार व्यक्ती आणि पुरवठादार अशा दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी सतीश इवरे हे शिवसेना तालुकाप्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांचे बंधू असल्याचे समजते.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:४५ वाजता कृषी अधिकारी (गु.नि.) कु. सोनाली सुतार आणि पथकाने टाकळवाडे येथील विकास सोसायटीच्या खत विक्री केंद्रावर छापा टाकला. यावेळी केंद्राचे जबाबदार व्यक्ती सतीश बाळासो इवरे (रा. टाकळवाडे) हे उपस्थित होते.
तपासणी दरम्यान दुकानात पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड (Paradeep Phosphates Ltd) या कंपनीचे १८:४६:० (७२ पोती) आणि १०:२६:२६ (४३ पोती) असा एकूण ५.७५ मेट्रिक टन खताचा साठा आढळून आला. मात्र, हा साठा ई-पॉस (e-POS) मशीनवर किंवा शासनाच्या IFMS प्रणालीवर नोंदवलेला नव्हता. तसेच या खताच्या खरेदीची कोणतीही अधिकृत पावती (Bill) जागेवर आढळून आली नाही.
लॅब रिपोर्टमध्ये खत ‘बोगस’
संशयास्पद वाटल्याने कृषी अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने कोल्हापूर येथील खत चाचणी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. दि. ६ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, या खतामध्ये रासायनिक अंश मान्य प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्याचे सिद्ध झाले असून ते ‘अप्रमाणित’ (Substandard) असल्याचे घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच नामांकित कंपनीच्या पोत्यांमध्ये बोगस खत भरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पुरवठादाराचीही साखळी उघड
सतीश इवरे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हे खत ईश्वरपूर (जि. सांगली) येथील विनायक उत्तम पवार यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, विनायक पवार यांनी आपण ‘महाराष्ट्र सहकार विकास महामंडळा’चे कर्मचारी असल्याचे भासवून हा पुरवठा केला होता. मात्र, चौकशीत पवार यांना २०२४ मध्येच कामावरून कमी केल्याचे समोर आले आहे.
शासकीय अनुदानित खतांच्या पोत्यांची हुबेहुब बनावट पोती छापून त्यात बोगस खत भरून शेतकऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील दोघांवर अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे: १) सतीश बाळासो इवरे (रा. टाकळवाडे, ता. फलटण) – विक्री केंद्र प्रमुख २) विनायक उत्तम पवार (रा. ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) – पुरवठादार
या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस खत माफियांचे धाबे दणाणले असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.
