दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२३ | सातारा |
उरमोडी धरणात रविवारी सातार्यातील सदर बझार येथे राहणारे दोन युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र, धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. युवक बुडाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी शोधकार्य हाती घेण्यात आले. दुसर्या दिवशी सकाळी १२.०० वाजता एक मृतदेह तर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह हाती लागला. या दुर्दैवी घटनेने सदर बझार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सौरव सुनील चौधरी (वय २२) व आकाश रामचंद्र साठे (वय २०, दोघेही रा. सदर बझार, सातारा) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
रविवारी हे दोन्ही युवक दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी सायळी गावाच्या हद्दीत धरणपात्रात प्रवेश केला व ठिकाणी पोहण्यास गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यातच बुडाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्याचे कुटुंबीय व काही मित्र घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली, मात्र काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यांनी शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीमला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. त्यामुळे रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी दुसर्या दिवशी सकाळी शोधमोहीमेस सुरुवात केली. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही.
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोधकार्य घेतले. यानंतर अंबवडे येथील काही युवकांनी शर्थींचे प्रयत्न करून दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास आकाश रामचंद्र साठे या युवकाचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर शोधकार्य सुरूच ठेवले. सायंकाळी ५.०० वाजून गेल्यानंतर सौरव सुनील चौधरीचा मृतदेह सापडला. त्यानंतर दोन्हीही मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.