दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अकलूज प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत व ध्वजगीत सादर केले. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीतील स्काऊट गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार सादर केले.
यावेळी प्रमुख आकर्षण असलेले नर्सरी, एलकेजी व पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर आधारित नृत्य सादर केले. सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या प्रसंगाने सर्व प्रेक्षक थक्क झाले. तसेच एल.के. जी. ते इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित इंग्रजीतून भाषणे केली. त्यानंतर शाळेतील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमुख अतिथी श्री. संभाजीराव गावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
शाळेचे प्राचार्य गिरधर गावडे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शाळेने सुरू केलेल्या साधनाज अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्स व प्री फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यातील सर्व स्पर्धात्मक परीक्षेची तयारी निश्चितच चांगल्या प्रकारे करतील असे नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नृत्यशिक्षक तेजस फाळके सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या शितल फडतरे व उपशिक्षिका वर्षा दोशी यांनी केले तर आभार रमेश सस्ते सर यांनी मानले.