दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुणवरे गावचे विद्यमान सरपंच श्री. चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ईश्वरतात्या गावडे, अध्यक्ष ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सिद्धी पिसाळ आणि तेजस्विनी ठणके यांनी केले. इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत उत्तम प्रकारे सादर केले. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजाला मानवंदना दिली. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी एकजुटीचे प्रतीक म्हणून विविध कवायत प्रकार सादर केले. यावेळी इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी अशा विविध विषयांवर भाषणे करून मुलांच्या अंगी असणार्या वक्तृत्वगुणांचे दर्शन घडविले.
यावेळी मंथन आणि स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे आणि गुणवरे गावचे सरपंच श्री. चंद्रशेखर चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे सर यांनी हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी सादर केला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. तसेच शाळेने सुरू केलेल्या उपक्रमाला पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व संस्थेचे संचालक आरटीओ इन्स्पेक्टर श्री. संभाजी गावडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रणव माळशिकारे यांने केले. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.