जगभरात 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच कोणत्याही मोबदल्याशिवाय रक्तदान करुन रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या नागरिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली जाते.
‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम दरवर्षी बदलत असते. 2023 या वर्षीच्या ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम “Give blood, give plasma, share life, share often” म्हणजे “रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा, वारंवार करा, जीवनदान द्या !” अशी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, यंदाची थीम ही ज्या रुग्णांना आयुष्यभर रक्ताची गरज असते, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करते. अशावेळी रक्त किंवा प्लाझ्मा दान करुन प्रत्येक व्यक्ती आपली मोलाची भूमिका अधोरेखित करू शकते. नियमितपणे रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याचं कर्तव्य, भवितव्य व महत्त्वही त्यामुळे अधोरेखित होतं. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रक्त आणि रक्तातील घटकांचा सुरक्षित तसंच सातत्यपूर्ण पुरवठा व्हावा, ते कायम उपलब्ध असावेत यासाठी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन आवश्यक आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
रक्तदान दिनाचा इतिहास
पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरुपात 2004 मध्ये साजरा करण्यात आला. पुढे 2005 मध्ये, 58 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 14 जून हा दिवस ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचं ‘जनक’ मानलं जातं. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगट प्रणालीची ओळख जगाला करून दिली. त्यांना रक्तगटांच्या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. लँडस्टेनर हे मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या या कार्यामुळे समान रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची प्रथा सुरू झाली. रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी समजून घेऊया.
हे करू शकतात रक्तदान
रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात. नॅशनल ब्लड ट्रान्सफुजन काऊन्सिलच्या मार्गदर्शक तत्वानुसार, भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं. भारतात पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
पण, काही देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय कायद्यानुसार 16 ते 17 वयोगटातील मुलांना रक्तदान करण्यास परवानगी आहे. पण, त्यासाठी त्यांना आवश्यक शारीरिक आणि रक्तविज्ञानविषयक निकषांची पूर्तता करणं गरजेचं असतं.
तर काही देशांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नियमित रक्तदाते डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तदान करू शकतात. काही देशांमध्ये रक्तदानाची वयोमर्यादा 60 वर्षांपर्यंत आहे. रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन 45 किलोपेक्षा कमी नसावं. आणि रक्तदात्याच्या शरिरातील हेमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा कमी नसावं.
हे करू शकत नाही रक्तदान
गेल्या वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही.
एखाद्याची एचआयव्हीची चाचणी सकारात्मक आली असेल, तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
रक्तदात्यानं रक्तदान करण्याच्या 15 दिवस आधी कॉलरा, टायफाईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसंच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही. रक्तदात्यानं शरिरावर टॅटू काढला असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही
हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
जर तुम्ही दातांवरील उपचारासाठी डेंटिस्टकडे गेला असाल, तर रक्तदान करण्यासाठी तुम्हाला 24 तास थांबावं लागतं. दाताशी संबंधित मोठे उपचार सुरू असेल तर तुम्ही महिनाभर रक्तदान करू शकत नाही. गर्भवती महिलांसंदर्भातही रक्तदान करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बाळाच्या जन्मानंतर कमीतकमी 9 महिने आणि बाळाने दूध सोडल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत महिलेला पुरेसा आहार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे या कालावधीत रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनुसार (NACO), महिलेनं डिलिव्हरीनंतर 12 महिने रक्तदान करण्यास टाळावं.
रक्तदान करण्यापूर्वीचा आहार
रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा. रक्तदानापूर्वी कमीतकमी 4 तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं. तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी, असं NACO च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे. रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता. रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
रक्तदान केल्यानंतरचे समज गैरसमज
रक्तदान केल्याने शरीरातील रक्त संपतं, हा गैरसमज आहे. प्रौढ शरीरात सरासरी 5 लिटर रक्त असतं. रक्तदान करताना 450 मिली रक्त आपल्या शरीरातून बाहेर काढलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरिरात तेवढं रक्त 24 ते 48 तासांत पुन्हा तयार होतं. रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं, असंही अनेकांना वाटतं. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीनं होते. रक्तदानामुळे झालेली रक्ताची हानी शरीर काही दिवसांत भरुन काढतं. रक्तदान केल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे का? तर रक्तदानासाठी रक्त घेताना डिस्पोजेबल निडल्स वापरल्या जातात. तसेच घेतलेल्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करुन रक्त सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. त्यामुळे रक्तदान केल्यानं आजारांचा संसर्ग होत नाही. रक्तदान करताना एकदा वापरलेलं इंजेक्शन पुन्हा वापरलं जाणार नाही, ही गोष्ट कटाक्षानं पाळावी लागते.
रक्तदानाचे फायदे
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दाव्यानुसार, रक्तदानाचा उद्देश केवळ गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं हा नाही. तर याचे इतरही अनेक फायदे आहेत. रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.
याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.
कोरोना रुग्णांचे रक्तदान
नॅको ने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोरोनाचे रुग्ण त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर रक्तदान करू शकतात. तर कोरोनाची लस घेतलेली व्यक्ती लस घेतल्याच्या तारखेपासून 28 दिवसांनंतर रक्तदान करू शकते.
लक्षात ठेवा. रक्तदान हे कर्तव्य आहे, महान राष्ट्राचे ते भवितव्य आहे.