स्थैर्य, फलटण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ठीक ठिकाणी रक्तदान करण्याचे आवाहन केलेले होते. सध्या करोना या आजाराने संपूर्ण राज्यासह जगात थैमान घातले असताना आपल्या येथे असणारा रक्तसाठा कमी असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन केलेले होते त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत फलटण शहरासह तालुक्यात असणाऱ्या मुस्लिम तब्लिकी समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेला होता. या आयोजित रक्तदान शिबिरामध्ये करोना या आजराबाबत शाशनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आलेले होते. फलटण शहरामधील व तालुक्यामधील नागरिकांनी सदरील रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. सदरील रक्तदान शिबिराला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट दिली.