मार्च महिन्यात कोरोना वायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी लाॅकडाऊन घोषित झाला. तो अजूनही बोकांडीवर बसला आहे. अन्नधान्याचे व्यापारी (किराणा दुकानदार) सोडले तर बाकी सर्वांना या लाॅकडाऊनचा हाय होल्टेज धक्का बसला. या धक्क्यातून सावरणे अशक्यप्राय झाले आहे. जनता अक्षरक्ष मेटाकुटीला आली आहे. गेली चार महिने सर्वांची फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. मोठमोठ्या उद्योजकांपासून छोट्या व्यवसायिकापर्यंत सगळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सामान्य जनता तर त्राही त्राही झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका कमी पण या बीन-कामाच्या सक्तिच्या उपाययोजनांनी निर्माण केलेला धोका फार मोठा वाटू लागला आहे. त्याने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे.
हे संकट कमी म्हणून की काय आता पावसाने दडी मारल्याने सर्व सामान्य माणूस उरलीसुरली आशा गमावण्याच्या मार्गावर आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. शेतात उगवलेले पीक सुकून चालले आहे, भाताची लावणी खोळंबली आहे. परिणामी सगळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. श्रावण महिना आला तरी अजूनही पावसाचा पत्ता नाही त्यामुळे फार मोठे संकट उभे राहिले आहे. एका बाजूला महापूराचे संकट आले तर उपाययोजना कशी असावी याची तयारी शासकीय यंत्रणा करत असताना, दुसर्या बाजूला जवळपास सर्व धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. या विरोधाभासाने हसावे की रडावे हेच लोकांना कळेनासे झाले आहे.
जर पुढील दोन चार दिवसात योग्य पाऊस पडला नाही तर यावर्षीचा संपूर्ण हंगाम हातातून जाईल या धास्तीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. दुर्दैवाने सरकार आणि शासकीय यंत्रणा याबाबत उदासीन दिसत आहे. प्रसार माध्यमांना कोरोना आणि राजकारण याच्यापलिकडे काही दिसतच नाही. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटावर ना चॅनेलवर चर्चा, ना वर्तमान पत्रात बातमी.
उत्तर-पुर्व भारतात महापूराने थैमान घातले आहे. पाच लाख लोक या पूराने बाधीत झाले आहेत आणि लाखो हेक्टर जमीनीवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तिकडे महापूरामुळे नुकसान तर इकडे पावसाअभावी नुकसान.
गेल्या चार महिन्यांपासूनच्या लाॅकडाऊनने भारताची क्रयशक्ती संपुष्टात आली आहे. नोकरदारांचे पगार अर्ध्यावर आले आहेत. सध्याची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर तेही बंद होतील. इतरांची आवक केव्हाच बंद झाली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंची महागाई तर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत जगावे कसे असा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत आहे.
आधी कोरोना आणि आता निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करीत आहे. असे का घडते आहे ?
संकट फार मोठे आहे. विचारपूर्वक वागा, जपून व्यवहार करा, एकमेकांशी सलोखा राखा, प्रेम आणि माणूसकी जपा.. अन्नधान्याचा व्यापार करणाऱ्यांनो जनतेची लूटमार करु नका, योग्य भाव घ्या व योग्य माल द्या त्यातून सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल. मित्रांनो आपल्या हातात एवढेच राहीले आहे.
– राजेंद्र आनंदराव शेलार, भिवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा