स्थैर्य, श्रीनगर, दि. २४ : जम्मू काश्मीर येथे सैन्यदलात सेवा बजावणारे पाल, ता. कराड येथील सुभेदार राजेंद्र जाधव यांचे सोमवारी, दि. 20 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. गुरुवारी सकाळी पाल येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र जाधव हे ए.जी.ई.आय रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. सुट्टीवर आलेले सुभेदार जाधव हे 8 दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथे कर्तव्य बजावण्यासाठी हजर झाले होते. सेवा बजावताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्रीनगर चंदीगड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी दि.20 जुलै रोजी त्यांचे रात्री निधन झाले. निधनाची वार्ता पाल गावी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव चंदीगड येथून पुणे येथे विमानाने आणण्यात आले. या ठिकाणी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे कमांडर यांनी जवान राजेंद्र जाधव यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुणे येथून जाधव यांचे पार्थिव रूग्णावाहिकेने पाल येथे आणण्यात आले. सुभेदार राजेंद्र जाधव यांचे पार्थिव पाल येथे येताच अमर रहे, अमर रहे, वीर जवान राजेंद्र जाधव अमर रहे। भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुख्य प्रवेशद्वारापासून सुभेदार जाधव यांची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पार्थिवसोबत श्रीनगर येथील ए.जी.ई.आय रेजिमेंटचे जवान नायब सुभेदार संदीप थोरात, राजेंद्र देशमुख, हवालदार दीपक राणा यांच्यासह सुट्टीवर असलेले सैन्यदलातील जवान गणेश कुंभार, हवालदार आर. एस. शिंदे, अनिकेत काळभोर व विजय काळभोर यांनी पुष्पचक्र अर्पण करून सुभेदार जाधव यांना अभिवादन केले.
पाल देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. गावात औषधांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला होता. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायजर आदींचा वापर करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्यात आले होते. कराड वाहतूक शाखा, उंब्रज, तळबीड पोलीस यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तारळी नदी काठावर असणार्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात सुभेदार राजेंद्र जाधव यांच्या पार्थिवाला त्यांच्या आठ वषार्र्ंच्या मुलाने भडाग्नी दिला.