कोरोना बाधित रूग्ण संख्येचा 5 हजाराचा आकडा पार
स्थैर्य, कराड, दि. ०७ : सातारा जिल्हय़ाने गुरूवारी कोरोना बाधित रूग्ण संख्येचा 5 हजाराचा आकडा पार केला. रात्री उशिरा आलेल्या अहवालात २०३ इतके बाधित आले आहेत. कराड तालुक्यात रूग्ण संख्या 1 हजारावर पोहोचल्याने येथील कोविड हॉस्पिटल्स आणि प्रशासनावर मोठा ताण आला आहे. त्यातच व्हेंटिलेटर न मिळाल्याने शहरातील आणखी एकाचा काल मृत्यू झाला. आतापर्यंत व्हेटिलेटर अथवा वेळेत उपचार न मिळाल्याने 6 मृत्यू त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे. कराड येथील तीनही हॉस्पिटल जिल्हय़ासाठी असून शहरात बाधित असणाऱ्या रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. अन्य आजारांच्या रूग्णांचीही हीच अवस्था असल्याने संताप व्यक्त होत आहे. गुरूवारी 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
व्हेंटिलेटर न मिळाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू
बुधवारी येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्याचा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही शहरातील सहावी घटना आहे. शहरात 300 दवाखाने असताना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे. या रूग्णास धाप लागली होती. नातेवाईकांनी येथील तिन्ही कोविड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. मात्र व्हेटिलेटर मिळाला नाही.
रूग्णवाहिकाही लवकर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सायंकाळी सातारा येथे शासकीय रूग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरात असे सहा मृत्यू झाले असताना शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दरम्यान, दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील यांच्यासह साबिर मुल्ला व नागरिकांनी प्रांत तथा इन्सिडेंट अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन व्हेंटिलेटर न मिळाल्याने आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.