सीईटी परीक्षा:राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.३: उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएमच-सीईटी) १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घेण्याचे नियोजन आखत आहे. त्यासंदर्भातले सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा, अशी माहिती सामंत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात बुधवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. परीक्षा सोप्या घेण्याचा विचार करावा तसेच कुलगुरू समितीचा अहवाल आल्यावर चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्यपाल यांनी केल्याचे सामंत यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

राज्यपालांसोबत गुरुवार, दि.३ रोजी सर्व अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या बैठकीत कुलगुरू समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) ला पत्र पाठवून परीक्षेसंदर्भातील राज्याचे नियोजन कळवण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विद्यापीठ परिसरात नवे वैद्यकीय महाविद्यालय

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना बुधवारी दिले.

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा पुढे ढकलली

दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!