स्थैर्य, खंडाळा, दि.७: घरामध्ये घुसून वृद्धांना लक्ष्य करीत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा शिरवळ पोलीसांनी पर्दाफाश केला असून दोन सराईत अनिल रघुनाथ बिरदवडे (वय ३१,),अशोक नामदेव गंगावणे (वय ३० दोघे रा.बांदलवाडी ता.बारामती जि.पुणे ) या गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांकडून पुणे जिल्ह्यातील भोर ,सातारा जिल्ह्यातील शिरवळ,वाई व फलटण पोलीस ठाणे हद्दीमधील ६ गुन्हे उघडकीस आणत ११ तोळे सोन्याचे दागिन्यांसह दोन दुचाकी ४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरवळ ता.खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये ७५ वर्षीय वृद्धा मालन रामचंद्र गायकवाड या घरामध्ये असताना अनिल रघुनाथ बिरदवडे, अशोक नामदेव गंगावणे हे दुचाकीवरून त्याठिकाणी आले. यावेळी राहत्या वस्तीपासून संबंधित घर हे लांब असल्याचा फायदा घेत व वृद्ध महिला एकटी असल्याचे पाहून आमची कपडे तुमच्याकडे इस्त्रीचे कपडे असतात ,माझे लग्न ठरले आहे माझ्या बायकोला तुमच्या गळ्यातील गाठणासारखे गंठण करायचे आहे तसेच तुम्हाला साडी कोणत्या कलरची घेऊ असे म्हणून गळ्यामधील ३० हजार रुपये किमतीचे ११ ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण व १५ हजार रुपये किमतीचे साधारणपणे ६ ग्राम वजनाचे सोन्याची पोत असा ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन वृद्धेला मारहाण करीत ढकलून देऊन घटनास्थळावरून संबंधितांनी दुचाकीवरून पलायन केले. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान पंढरपूर फाटा याठिकाणी बिगर नंबरप्लेटची एक दुचाकी व दोन व्यक्ती येताना दिसल्या असता संबंधितांना शिरवळ पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी चालकाने नाकाबंदी तोंडत लोणंद बाजूकडे दुचाकी वेगाने घेतली . यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे ,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे , पोलीस हवालदार रवींद्र कदम , संतोष मठपती , जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड,नितीन महांगरे ,शिवराज जाधव,नवनाथ कोळेकर,प्रशांत वाघमारे,धीरज यादव यांनी तत्काळ चित्रपटाला शोभेल असा थरारक पाठलाग करीत माने कॉलनीलगत दुचाकी अडवत सराईत गुन्हेगार अनिल रघुनाथ बिरदवडे , अशोक नामदेव गंगावणे यांना ताब्यात घेत अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान संबंधितांवर पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये चाकण , शिक्रापूर,वडगाव निंबाळकर,बारामती याठिकाणी गुन्हे दाखल असून तुरुंगातून सुटल्यानंतर संबंधित दोघांनी शिरवळमध्ये ७५ वर्षीय वृद्धेला लुटत मुद्देमाल लपवला असल्याचे कबुल केले. त्याचप्रमाणे वाई शहरमध्ये दोन ठिकाणी , फलटणमध्ये दोन ठिकाणी व भोर जि.पुणे याठिकाणी दोन असे गुन्हे करीत बारामती व भवानीनगर येथील सोनारांना सोन्याचे दागिने विकल्याचे कबुल केले आहे.
यामध्ये शिरवळ पोलीसांनी सराईत गुन्हेगारांकडून तब्बल ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन दुचाकी (बिगर नंबर प्लेट,एमएच-४२-एझेड-४२८६ असा ४ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.