

स्थैर्य, मुंबई, दि.३: ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्विट ‘लाइक’ करण्यावरून कंगनाचे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. मला मुंबई पोलिसांची भीती वाटते असे वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौटने केले होते. आता तिच्या या वक्तव्याचा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी समाचार घेत तिला धारेवर धरले आहे. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला ठणकावले.
निलेश राणे ट्विट मध्ये म्हणाले की, “दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौट) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
“मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास तयार आहे पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण मिळावे. मी फक्त माझे करिअरच नाही तर माझा जीवही धोक्यात घातला आहे, हे स्पष्ट आहे की सुशांतला काही रहस्यं माहित होती, म्हणूनच तो मारला गेला.” असे ट्विट कंगनाने आठ दिवसांपूर्वी केले होते.
“सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्विट लाइक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलिस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्विट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

