
स्थैर्य, मुंबई, दि.३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून रेस्तराँ बंद आहेत. आता या व्यवसायिकांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. रेस्तराँ व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन मागणी केली आहे. यापूर्वी सुळेंनी जिम आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्याबाबतही सुळे यांनी पाठपुरावा केला होता. आता त्या रेस्तराँ व्यावसायिकांच्या मागे उभ्या राहिल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की – ‘कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्तराँचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्तराँ चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘ असे म्हणत त्यांनी व्यावसायिकांच्या अडचणी सरकारसमोर मांडल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्तराँ सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा.’ अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यासोबतच ‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले पत्रही त्यांनी सोबत जोडले आहे.