पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीमधील गटबाजीने खडसेंचे स्वागत; बड्या नेत्यांनी टाळली भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, जळगाव, दि.२६: भाजप सोडून
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्ष
प्रवेशानंतर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या
जिल्हा कार्यालयाला भेट दिली. परंतु, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी
काँग्रेसमधील गटबाजीने खडसेंचे स्वागत केले. खडसेंच्या स्वागत सोहळ्याचा
कार्यक्रम ठरलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक बड्या नेत्यांनी
खडसेंची भेट टाळली. केवळ महानगर कार्यकारिणीच्या पदाधिका-यांनी खडसेंच्या
स्वागताचा सोपस्कार पार पाडला. त्यांच्याकडून स्वागत स्वीकारून खडसे अवघ्या
१५ मिनिटात मुक्ताईनगरकडे रवाना झाले.

मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे शनिवारी रात्री उशिरा जळगावात
त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. रविवारी सकाळपासून त्यांच्या स्वागतासाठी
समर्थक तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानी गर्दी केली
होती. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास खडसे हे पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या
अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात
दाखल झाले. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी
करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या
पदाधिका-यांनी खडसेंचे औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
प्रदान केल्या.

देवकर नॉट रिचेबल

या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक बड्या नेत्यांसह
पदाधिका-यांची अनुपस्थिती होती. ही बाब लक्षात आल्याने खडसेंनी
कार्यालयाबाहेरच स्वागत स्वीकारले. अवघ्या १५ मिनिटात तेथून काढता पाय घेत
ते जळगावातून मुक्ताईनगरला रवाना झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीची
एकच चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील म्हणाले की, गटबाजीचा काही
विषय नाही. माझ्याकडे ग्रामीण कार्यकारिणीच्या कार्यक्रमाची जबाबदारी
असल्याने मी त्या गडबडीत होतो. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यालयातील
कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, असे उत्तर देत त्यांनी अधिक बोलणे टाळले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!