स्थैर्य, मुंबई, दि.१: बेळगाव, निपाणीसह संयुक्त
महाराष्ट्र हा निर्धार असून, बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव
महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला माझ्यासह
महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
व्यक्त केले आहे.
माध्यमांशी
बातचीतदरम्यान पवार म्हणाले की, ‘मराठी बांधवांच्या सीमाभागातील संघर्षाला
माझा जाहीर पाठिंबा आहे. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठी भाषिक सीमाभाग
महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही. मागील अनेक
दिवसांपासून सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रातील
जनता तसेच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
आहे,’ असेही अजित पवार म्हणाले.
काळा दिनी आंदोलनापासून रोखण्यासाठी नाकेबंदी
बेळगावात
आज सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी करुन मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यास
सुरुवात केली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्र सरकारचा
निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या काळ्या दिनाच्या धरणे आंदोलनात जनता
पोहोचू नये यासाठी शहरातील विविध भागात नाकेबंदी करण्यासह लोकांची कसून
चौकशी करण्यात आली. तसेच, काळे कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांना जाब
विचारण्यात आला.