स्थैर्य, सातारा, दि. 24 : येथील अजंठा चौकात पानशॉपच्या आडोशाला चोरून गुटखा विकणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अजय शंकर भोसले वय 19, रा. हॉटेल लेक-ह्यू शेजारी, गोडोली, सातारा असे संशयीताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, अजंठा चौक, पांचाली हॉटेल समोर श्री साई पान शॉपच्या आडोशाला एकजण बेकायदेशीरपणे चोरटा गुटखा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता अजय शंकर भोसले हा तेथे बेकादेशीरपणे गुटखा विक्री करताना आढळला. त्याच्या मोटारसायकलच्या डीकीमध्ये गुटख्याचा माल मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा, मोटार सायकल असा एकुण 51 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याच्यावर सातारा शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांच्या सुचनेनुसार सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, पो. ना. योगेश पोळ, नितीन भोसले, प्रविण कडव, केतन शिंदे यांनी केली.